डॉ. सारिका जोगळेकर
होमिओपॅथिक तज्ज्ञ
धुक्याच्या कुशीत हिवाळ्याने अलगद प्रवेश केला आहे… हवेत गारवा आणि वातावरणात प्रसन्नता भरली आहे. शरीर आणि मन दोघांनाही विश्रांती देणारा, हा ऋतू अनेकांना आवडतो. मात्र या ऋतूत हवेतील कोरडेपणा वाढलेला असल्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं.
हिवाळा सुरू होताच, शरीराला तापमानातील बदलाशी जुळवून घ्यावं लागतं. हवेत गारवा वाढल्यावर शरीराचं तापमान कायम ठेवण्यासाठी मेंदू काही विशेष प्रतिक्रिया देतो. वाढत्या थंडीशी जुळवून घेण्यासाठी आपले शरीर ‘हिस्टामिन’ नावाचे एक रसायन तयार करते. हिस्टामिनमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे शरीरातून उष्णता बाहेर जाणं कमी होतं. त्यामुळे हातपाय थंड वाटू शकतात, पण शरीरातील उष्णता केंद्रभागी टिकवली जाते.
थंड हवेत शरीराचा मेटाबॉलिझम थोडा वाढतो – म्हणजेच शरीर उष्णता निर्माण करण्यासाठी अधिक ऊर्जा वापरू लागते. त्यामुळे भूक थोडी जास्त लागते आणि गरम पदार्थांची इच्छा वाढते. याच काळात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती थोडीशी कमी होऊ शकते, म्हणूनच सर्दी, खोकला, सायनस, दमा, ॲलर्जी अशा तक्रारी जास्त दिसतात.
हिवाळ्यात वातावरण कोरडे आणि थंड असते. त्यामुळे हवेत आर्द्रता (moisture) कमी होते आणि श्वसनमार्गातील श्लेष्मल झिल्ली (mucous membrane) कोरडी पडते. ही कोरडी झिल्ली धूळ, धूर, परागकण (pollen) आणि घरातील बुरशी (mold) यासारख्या ॲलर्जन्सना अधिक संवेदनशील बनवते. त्यामुळे ॲलर्जीचा प्रारंभ होतो. थोडक्यात, ॲलर्जी म्हणजे शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली (immune system) एखाद्या निरुपद्रवी घटकावर अतिसंवेदनशील प्रतिक्रिया देते. हायपर रिॲक्शन किंवा हायपर सेंसिटिव्हिटी असं सुद्धा आपण म्हणू शकतो.
हेही वाचा – Homeopathy : थायरॉईड, शरीराचं गतिमान इंजिन
ॲलर्जीची सर्वसामान्य लक्षणे
- सतत शिंक येणे, विशेषतः सकाळी उठल्या उठल्या
- नाक वाहणे, नाकाच्या आत खाज येणे
- एक किंवा दोन्ही नाकपुडी बंद होणे
- डोळे चुरचुरणे, डोळ्यातून पाणी येणे
- खोकला, घशात खवखव
- थकवा, सलग शांत झोप न लागणे
- डोकेदुखी
- ताप
- नाकातून रक्त येणे (नाकातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. नाकातील रक्तवाहिन्या अतिशय नाजूक असतात म्हणून काही वेळेला त्या फुटून त्यातून रक्त येऊ शकते)
काळजी घेण्याचे घरगुती उपाय
- घरात स्वच्छता ठेवा : गालिचे, पडदे आणि बेडशीट नियमित धुवा. व्हॅक्युम क्लीनरचा वापर केल्यास हा त्रास कमी होऊ शकतो.
- आर्द्रता राखा : हवेत थोडी आर्द्रता ठेवण्यासाठी ह्युमिडिफायर वापरा किंवा पाण्याची वाटी खोलीत ठेवा.
- गरम पाणी प्या : श्वसनमार्ग ओलसर राहतात आणि ॲलर्जी कमी होते.
- नाकाची स्वच्छता : सलाइन वॉश (saline nasal wash) उपयोगी ठरते.
- नाकाच्या आतल्या बाजूला गाईचे तूप लावा. रोज सकाळी घराबाहेर पडण्याआधी हे केले तर सर्दीचा त्रास कमी होऊ शकतो.
- रोगप्रतिकारशक्ती वाढवा : संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम आवश्यक.
- नियमित वाफ घेणे उपयुक्त ठरेल.
हेही वाचा – Homeopathy : कोलेस्ट्रॉल वाढणे हा आजार नव्हे तर, एक चेतावणी
ॲलर्जीसाठी होमिओपॅथीची निवड का करावी?
काही लोकांना धूळ असली तरी काही होत नाही, पण काहींना त्याच धुळीमुळे लगेच शिंक, खोकला किंवा ॲलर्जीचा त्रास सुरू होतो. असं का होतं? त्याचं कारण म्हणजे प्रत्येक व्यक्तीची संवेदनशीलता (sensitivity) वेगळी असते. त्यामुळे एकाच गोष्टीवर सगळ्यांची प्रतिक्रिया सारखी नसते. काहींचे इम्युन सिस्टीम अतिसंवेदनशील असते तर काहींची संतुलित असते. ही संवेदनशीलता शरीराच्या प्रकृतीवर, मानसिक स्थितीवर, वातावरणाशी जुळवून घेण्याच्या क्षमतेवर आणि अनुवांशिकतेवर (genetic) अवलंबून असते आणि नेमकं हेच होमिओपॅथीच वैशिष्ट्य आहे! म्हणून होमिओपॅथी ॲलर्जीमध्ये अधिक यशस्वीरित्या काम करते. होमिओपॅथीमध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या प्रकृतीनुसार वेगळं औषध दिलं जातं. कारण उपचार नुसतं लक्षणांवर नव्हे तर, व्यक्तीच्या संवेदनशीलतेवर आणि मूळ कारणावर केंद्रित असतात.
होमिओपॅथी “like cures like” या तत्वावर काम करते – म्हणजे ज्या पदार्थामुळे लक्षणे निर्माण होतात, त्याचाच अतिशय सूक्ष्म प्रमाणात वापर करून शरीराला ती स्थिती ओळखण्याची आणि प्रतिकार करण्याची क्षमता दिली जाते. त्यामुळे –
- औषधं शरीराच्या इम्यून सिस्टीमला संतुलित करते.
- अतिसंवेदनशील प्रतिक्रिया कमी करते.
होमिओपॅथीचे ॲलर्जीमध्ये होणारे फायदे
दीर्घकालीन परिणाम : ॲलर्जीचा त्रास प्रत्येक सीझनमध्ये बदल झाला की, होऊ शकतो. त्यामुळे तात्पुरता परिणाम होण्यापेक्षा त्रासाची पुनरावृत्ती (recurrence) नियंत्रणात येणं महत्त्वाचं असतं. होमिओपॅथिक औषध आणि पुनरावृत्ती हळूहळू कमी होते आणि शेवटी थांबते. प्रतिबंधनात्मक परिणाम होमिओपॅथिक औषधे अगदी सहज करू शकतात.
नैसर्गिक आणि सुरक्षित : कोणतेही दुष्परिणाम नाहीत.
व्यक्तिगत उपचार : प्रत्येक व्यक्तीला वेगळी लक्षणे आणि ती लक्षणे येण्यामागची वेगळी कारणे असतात, त्यामुळे उपचार सुद्धा व्यक्तिनिष्ठ (individualized) असणं आवश्यक आहे आणि ते फक्त होमिओपॅथीने साध्य होऊ शकतो.
Allium cepa, arsenic album, sabadilla यासारखी अनेक औषधे आहेत, जी तुम्ही योग्य सल्ल्याने योग्य प्रमाणात घेतल्याने तुम्हाला नक्की फायदा होईल.
हिवाळा सुंदर असतो, जर आपण शरीराची योग्य काळजी घेतली तर! होमिओपॅथीच्या मदतीने आपण ही थंडी केवळ सहनच नाही तर, आनंदाने जगू शकतो – थंडीवर नैसर्गिक ऊब देणारा उपचार म्हणजे होमिओपॅथी!
HOLISTIC HOMOEOCURE CLINIC
ऋतू पार्क, ठाणे वेस्ट
मोबाइल – 9890533941


