माधवी जोशी माहुलकर
हिवाळा सुरू झाल्यावर हिरव्यागार आणि ताज्या भाज्या यायला सुरुवात झाली की, घराघरातील गृहिणींना या भाज्यांपासून किती पदार्थ करावे आणि किती नको असे होऊन जात. याच सीझनमधे तुरीच्या शेंगा, पोपटीच्या शेंगा, हुरडा, हरभरा असे कितीतरी फ्रेश प्रकार उपलब्ध असतात. हे पदार्थ असे आहेत की, जेवताना तोंडी लावणे म्हणून खा किंवा दुपारच्या वेळेस खा… कसेही आणि कोणत्याही वेळेस खाल्ले तरी चालतात. अशा पदार्थांचे सेवन करण्याची कोणतीही एक ठराविक वेळ नसते. तुरीचे तुपाच्या फोडणीतील दाणे आणि वाणीचा हुरडा (ज्वारीचे कोवळे, हिरवे दाणे) थंडीच्या दिवसांत दुपारी चहा न घेता एखादी मुव्ही किंवा सीरियल पहाताना टाइमपास म्हणून खाणे छान वाटते. तुरीचे तुपातील दाणे आणि त्यात असलेला ओल्या लसणाचा स्वाद गजब लागतो.
तुपाच्या फोडणीतील तुरीचे दाणे
साहित्य
- तुरीचे ओले दाणे – 2 वाट्या
- तूप – 2 मोठे चमचे
- ओल्या लसणाची बारीक चिरलेली पात – 1 वाटी
- ओल्या लसणाचे बारीक चॅाप केलेले तुकडे – 4 ते 5
- हिरवी मिरची, कोथिंबीर पेस्ट – 2 चमचे
- आल्याची पेस्ट – 1 चमचा
- जिरे – 1 चमचा
- धणे पावडर – 1 चमचा
- गरम मसाला – 1 चमचा
- हळद – 1 चमचा
- हिंग – 1 छोटा चमचा
- मीठ – चवीनुसार
- साखर – चवीनुसार
- लिंबू – 1
- थोडी कोथिंबीर
हेही वाचा – Recipe : मोड आलेल्या मुगाचे सूप (कढण)
कृती
- कुकरमध्ये तूरीचे दाणे थोडे मीठ टाकून एक शिट्टी टाकून वाफवून घ्यावे.
- कुकरचे प्रेशर गेल्यावर तुरीचे दाणे चाळणीवर काढून ठेवावे म्हणजे त्यातील जास्तीचे पाणी निघून जाईल.
- नंतर एका कढईत दोन चमचे तूप तापवून घ्यावे. ते तापले की, त्यामध्ये एक छोटा चमचा हिंग टाकून जिरे टाकावे.
- जिरे तडतडल्यावर त्यामध्ये बारीक चॉप केलेले ओल्या लसणाचे तुकडे टाकून ते गुलाबीसर होऊ द्यावेत.
- लसूण गुलाबीसर झाला की, त्यात कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून ती परतून घ्यावी.
- नंतर त्यात आल्याची पेस्ट टाकून हे मिश्रण पुन्हा परतून घ्यावे.
- ते झाल्यावर यामध्ये एक चमचा हळद टाकून वाफवलेले तुरीचे दाणे टाकावे.
- नंतर त्यात एक चमचा गरम मसाला, धणे पावडर, चवीनुसार मीठ आणि साखर टाकून हलक्या हाताने सर्व पदार्थ मिक्स करावेत.
- हे सर्व झाले की, या दाण्यांवर बारीक चिरलेली ओल्या लसणाची पात भुरभरुन टाकावी व परत एकदा सर्व साहित्य छान मिसळून घ्यावे.
- त्यानंतर लिंबाचा रस आणि कोथिंबीर टाकून हे तुरीचे दाणे सर्व्ह करावे आणि या तूपातील गरमागरम तूरीच्या दाण्यांचा आस्वाद घ्यावा.
वाणीचा हुरडा
साहित्य
- वाणीचा हुरडा – 2 वाट्या
- हिरवी मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट – 1 चमचा
- हुरडा परतण्यापुरते तेल
- जिरे – 1 चमचे
- मीठ – चवीनुसार
- भाजलेले तीळ – 4 चमचे
हेही वाचा – Recipe : अंबाडीची फुले आणि पुदिन्याची चटणी
कृती
- कढईत गरजेनुसार तेल टाकून ते तापले की त्यामध्ये जिरे टाकावे.
- जिरे तडतडल्यावर त्यामध्ये हिरवी मिरची आणि कोथिंबीर पेस्ट घालून ती थोडी परतावी.
- त्यानंतर लगेचच हुरडा टाकून हे मिश्रण मंद गॅसवर खालीवर करत हळूवारपणे परतत, हुरडा भाजून घ्यावा.
- हुरडा थोडा वाफवला गेला की गॅस बंद करुन त्यामध्ये भाजलेले तिळ टाकावे आणि चवीनुसार मीठ टाकावे.
- लिंबू पिळून कोवळा आणि भाजलेला हुरडा चवीने खात फस्त करावा.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


