लेखक ह. मो. मराठे यांची ओळख म्हणजे, कथाकार, कादंबरीकार, पत्रकार, संपादक… त्यांच्या ‘निष्पर्ण वृक्षाखाली भर दुपारी’ यासारख्या कादंबऱ्या गाजल्या आहेत. अनेक नियतकालिकांचे संपादन त्यांनी केले आहे. ‘बालकाण्ड’मध्ये लेखकाने स्वतःची कहाणी सांगितली आहे. पुस्तक वाचताना मनाला वेदना होतात. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर तुळतुळीत गोटा, शेंडी असलेल्या चेहऱ्यावर हरवलेले भाव असलेल्या लहान मुलाचे चित्र आहे. कोकणस्थी भाषेचा प्रयोग या पुस्तकात आहे. ही भाषा बोली भाषा आहे, मराठीची एक बोली भाषा… फारशी माहीत नसलेली!
लेखक हनु (हनुमंत) सात-आठ वर्षांचा असतानाचा काळ यात आहे. या वयाच्या मुलाच्या नजरेतून कहाणी सांगितली आहे. त्याला इतक्या लहान वयात द्वेष, मत्सर, राग, करुणा या भावना असू शकत नाहीत किंवा त्याच्यावर ही परिस्थिती कोणामुळे ओढवली, याचे आकलन सुद्धा नाही. त्याला फक्त एकटेपणाची भावना आहे, भीती आहे, धास्तावलेपण आहे, आईची आठवण आहे, थोडे प्रेम आणि आपलेपणा हवा आहे. लेखकाने मोठ्या माणसाच्या नजरेतून न लिहिल्यामुळे त्यातला खरेपणा मनाला भिडतो. काहीशा अलिप्ततेने प्रसंग लिहिले आहेत.
लेखकाच्या वडिलांचे, मोरोबांचे कोकणात झोळम्याला आणि सुर्ल्याला मोठे घर, शेतीवाडी होती. संपन्नता होती. हनुची मुंज थाटात झाली होती. पण रागीट स्वभावामुळे, विक्षिप्त वागण्यामुळे मोरोबांनी सर्व घरसंसार विकून टाकला. फक्त दोन पेटी भांडी घेऊन ते तीन मुलांसह तीर्थाटनाला निघून गेले. जिथे त्यांची कोणाशी ओळख नव्हती. लेखक लिहितो इथून आमच्या देशोधडीला सुरुवात झाली. वडील मोरोबांचा, मुलांनी इंग्लिश शाळेत शिकायला विरोध होता. त्यांना बाबल आणि हनू या दोघांना कीर्तनकार करायचे होते. त्यांनी पत्नी मुलांसकट गावोगावी तीर्थयात्रेसाठी हिंडायला सुरुवात केली. धार्मिक स्वभावाचे असल्याने जे घडते ते रामरायच्या इच्छेने, असे ते म्हणत.
हेही वाचा – Bookshelf : मनात खोलवर प्रभाव पाडणाऱ्या ‘चौघीजणी’
या विक्षिप्त वागण्याचा आईच्या मनावर परिणाम झाला. ती आजारी राहू लागली, तेव्हा त्यांना तिला भूतबाधा झाली आहे, असं वाटलं. जवळचे पैसे संपल्यावर पोटापुरते अन्न मिळण्याची चिंता वाटू लागली, तेव्हा ते एका नातेवाईकाकडे गेले. तिथे काही दिवस राहून पुन्हा सुरल्याला आले. राहायला घर नव्हते. आईची पचनशक्ती बिघडल्यामुले सतत शौचाला जावे लागायचे. इतकी ताकद नसल्याने पानांच्या पोवळ्या करून त्यात ती शौच करीत असे आणि ते उचलण्याचे काम लहानग्या हनुचे होते. आई शेवटी शेवटी कुत्र्यासारखे चालत जाऊन भुंकण्याचा आवाज काढत असे.
तिच्या मृत्यूने हनु आणि बाबलचे बालपण संपले. वडिलांचा संताप, चिडचिड वाढली. हनुला आत्याकडे राहायला ठेवले. तिथेही त्याच्या वाट्याला दूषणं आली. परक्या घरी राहायचे तेव्हा अपमान सोसावे लागणारच! त्याला कपडे नसल्याने गार वारा अंगाला झोंबत असे. सगळे जण जत्रेला गेले तरी, याला कोणी नेत नसे. याचा उद्रेक होऊन हनु एक दिवस शापवाणी उच्चारतो, जी खरी होते. यानंतर त्याच्याशी घरातले लोक बोलणे टाकतात. हे वर्णन वाचताना मनाला क्लेश होतात. सात-आठ वर्षाच्या मुलाला काय काय सोसावे लागले! पण त्याला आता परिस्थितीशी झगडायचे आहे, हे समजले आहे. तो विरोध करू लागला आहे.
नंतर वडील त्याला घेऊन पुन्हा गावी येतात. तिथे त्यांच्याकडे तांदूळ, डाळ विकत घ्यायचे पैसे नसतात, त्यातच कोर्टात दावा लावलेला असतो. कंदमुळे, फळे खाऊन दिवस काढावे लागतात. मोरोबांच्या हलगर्जीपणामुळे सगळी संपत्ती नातेवाईक लुटतात. त्यांच्या मनमौजी वागण्यामुळे, कधीही उठून तीर्थयात्रेला जाण्यामुळे पैसे बुडतात. लिलावात घर जाते. कफल्लक अवस्थेत फिरावे लागते. यामुळे संताप, चिडचिड, दात-ओठ खाणे, उगीच भांडण करणे, मारामाऱ्या करणे वगैरे होऊ लागते.
तीन गुरे आणि हे तिघे पायीपायी गावोगावी चालत जाताना मधेच थांबून तीन दगडांची चूल करून भात शिजवून खातात आणि पुढे चालू लागतात. कुठल्याही झाडाखाली राहायचे, उघड्यावर राहायचे. लेखकाच्या मुलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा पुऱ्या होत नाहीत. ते लिहितात, काका (वडील) पायताण आणि कपडे घालून, बाबल पंचा नेसून आणि मी फक्त लंगोटी लावून चालत होतो. दोघे अनवाणी, डोक्यावर टोपी नाही. पायाखाली गरम माती, डोक्यावर आग ओकणारा सूर्य, पोटात भूक, दमलेले पाय… डोळ्यासमोर चित्र उभे राहते आणि पोटात कालवाकालव होते. रानात झाडाखाली रात्रंदिवस एकटा राहून दिवस काढणारा तो लहान मुलगा डोळ्यासमोर येतो.
बाबलला मोरोबांच्या मारण्याचा, त्रागा करण्याचा वैताग येतो आणि एक दिवस रागावून मालवणला एकटाच निघून जातो आणि तिथे भिक्षुकी करून परिचितांच्या घराच्या मांगरात राहात असतो. मोरोबा हनुला घेऊन तिथे गेल्यावर मात्र हनुला थोडे स्थैर्य येते. त्याची शाळा सुरू होते. बोलीभाषेऐवजी मराठी बोलायला सुरुवात होते. बाबल त्याला सातवीपर्यंत शिकवायचे ठरवतो. मोरोबांची चिडचिड पुन्हा सुरू होते, मालवण सोडून जायची तयारी होते; पण यावेळी बाबल हनुला त्यांच्याबरोबर जाऊ देत नाही.
हेही वाचा – भारतीय तत्वज्ञानाची झलक… पवनाकांठचा धोंडी!
चरित्र वाचताना दारिद्रय किंवा भूक या दोन्ही गोष्टी काय असतात याची जाणीव होते. हे सगळे अनुभव खरे असल्यामुळे गांभीर्य अधिकच जाणवते. हनुच्या वडिलांचा प्रचंड राग येतो, पण दयाही येते. ते मानसिकरुग्ण असल्याने पूर्ण कुटुंबाची होरपळ होते. ही कहाणी अतिशय करूण आहे, पण लेखकाने वृत्तांत सांगितल्यासारखी, कुठेही आक्रस्ताळी मत न देता, भडकपणा न आणता, लिहिले आहे. यात संवाद आहेत… काही लांबलचक आहेत, पण कंटाळवाणे होत नाहीत. अनावश्यक शब्दांचा वापर करून विनाकारण लालित्य आणण्याचा अट्टाहास न धरल्यामुळे प्रखर सत्य समोर येते, जे वाचकाला विषण्ण करते.
‘बालकाण्ड’ म्हटल्यावर रामायणाची आठवण होते. रामाचे बालपण त्याच्या आयुष्यातला सगळ्यात सुखकारक काळ होता, पण हनुच्या बाबतीत तसे घडले नाही. रम्य ते बालपण किंवा बालपण देगा देवा वगैरे म्हणणारे किती भाग्यवान असतात, ते ही कहाणी वाचून समजते. बालपण रम्य वगैरे असण्यासाठी नशीब लागते, अन्यथा असा रखरखीत उन्हाळा वाट्याला येतो. या विषम परिस्थितीवर मात करून ते प्रसिद्ध कादंबरीकार, संपादक झाले याचे आश्चर्यमिश्रित कौतुक वाटत राहाते!
एका वेगळ्या जगाचा, समाजाच्या उच्च जातीवर्गाचा जवळून परिचय करून देताना कितीतरी पूर्वग्रह, गृहितके गळून पडतात. रश्मीरथी काव्यात ‘कृष्ण कि चेतावनी’मध्ये कवी म्हणतो,
वर्षों तक वन में घूम-घूम,
बाधा-विघ्नों को चूम-चूम,
सह धूप-घाम, पानी-पत्थर,
पांडव आये कुछ और निखर।
सौभाग्य न सब दिन सोता है,
देखें, आगे क्या होता है।
हनुचे पुढे काय झाले? याची पुरेशी उत्सुकता मनात निर्माण होताना चरित्र संपते आणि मनात रेंगाळत राहते… बालकांड यासाठी वाचायला हवे.


