गेल्या महिन्यातली गोष्ट. एका अनोळखी परदेशी नंबरवरून मला व्हॉट्स ॲप मेसेज आला होता, “मी येतोय…” या दोन शब्दांनी कसलाच अर्थबोध होत नव्हता. राहून राहून एका गोष्टीचं आश्चर्य मात्र वाटलं की, मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला माझा मोबाईल नंबर कुठून मिळाला, याचं! पण पुढच्या काही दिवसांत येणारे मेसेजेस् वाचून हळूहळू गोष्टी उलगडत गेल्या… आणि त्या सर्वांवर कळस म्हणजे चार दिवसांपूर्वी आलेला मेसेज, “दादा, आबांना सांग,
तुमच्या नात्याच्या तीळात
माझ्या अस्तित्वाचा तीळ
चला बांधूया नव्याने
आपल्या आयुष्याचे देऊळ…
मकर संक्रांतीच्या तीळगुळमय शुभेच्छा.
पहाटेची वेळ. सोसायटीच्या मेन गेटच्या सिक्युरिटी ऑफिसमधून फोन आला, “सर, सुयश जोशी म्हणून एक जण आले आहेत आफ्रिकेहून.”
“त्यांना वर पाठवा,” असं म्हणून मी इंटरकॉम बंद केला.
आजवर मेसेज पाठवून माझी उत्सुकता शिगेला पोहोचवणारा सुयश अखेर काही क्षणांतच डोळ्यांसमोर उभा राहाणार होता. मी फ्लॅटच्या मुख्य दरवाज्यापाशी उभा राहून समोरच असलेल्या लिफ्टचे एकेक करत वाढत जाणाऱ्या मजल्यांचे आकडे बघत होतो. शेवटी 30 आकड्यावर येऊन लिफ्ट थांबली. स्वयंचलित दरवाजे उघडले. पॅसेजमधल्या प्रकाशात तो मला सामोरा गेला… दोन्ही हातातील बॅगांच्या ट्रॉलीचे हॅंडल खाली ढकलून पुढच्याच क्षणी, “दादा, मला माफ कर,” असं म्हणत त्याने मला घट्ट मिठी मारली!
हेही वाचा – मनाची श्रीमंती… मित्राची अनोखी कहाणी!
चाळीस वर्षांपूर्वी रागाच्या भरात घर सोडून गेलेल्या सुयशमुळे आजवर झालेला मनस्ताप बोलून दाखवू की तो भेटल्याचा आनंद व्यक्त करू? मला क्षणभर काहीच सुचेना. पण माई-आबांचे संस्कार आणि शिकवण यांनी मला भानावर आणले. मी सुयशच्या डोक्यावरून हात फिरवत त्याच्या पाठीवर अलगद थोपटत त्याला म्हणालो, “चल वेडा कुठला. माझी कसली माफी मागतोस. उशिराने का होईना, पण तुझं तुलाच घरी यावंस वाटलं, यातच आधीच्या काळातील सगळं संपून गेले आहे. चल आता आत ये. तुझी खोली दाखवतो मी. आराम कर. सकाळी बोलू आपण…”
सुयश गलेलठ्ठ बॅगा घेऊन आत आला.
“दादा, आबा कसे आहेत रे? माझे मेसेजेस् त्यांना वाचून दाखवले आहेस ना तू?”
मी म्हणालो, “नाही.”
“का रे दादा?”
“जोपर्यंत तू खरंच येऊन पुढे उभा राहात नाहीस, तोपर्यंत मला देखील खात्री नव्हती तुझ्या येण्याची! कारण, ज्या पद्धतीने तू रागाच्या भरात घर सोडून निघून गेला होतास आणि इतकी वर्षे तू आमच्या कोणाच्याही संपर्कात नव्हतास, त्यामुळे तू खरंच येशील याची खात्री मला सुद्धा नव्हती. आबा आज आयुष्याच्या प्रवासाच्या अखेरच्या टप्प्यात आले आहेत. नुकतीच हृदयाची मोठी, पण तितकीच गुंतागुंतीची आणि क्षणाक्षणाला काळजाचा ठोका वाढवलेली शस्त्रक्रिया निव्वळ जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर यशस्वीपणे पार करून ते घरी आले आहेत. कदाचित, तुझ्या येण्याची चाहूल त्यांच्या अंतर्मनाला आधीच लागली असणार… आजवर त्यांनी कधी स्पष्टपणे तसं बोलून नाही दाखवलं, पण ते नक्कीच वेडी आशा लावून बसले असणार की, कधीतरी तुझं मन बदलेल आणि तू भेटायला येशील त्यांना!”
सकाळी आबांचा चहा, ब्रेकफास्ट संपल्यावर सुयश त्यांच्या समोर उभा राहिला आणि आजवर सगळ्या संकटांना खंबीरपणे तोंड देत ताठ मानेने जगलेला त्यांच्यातील नटसम्राट सुयशला अचानकपणे समोर बघून भावनांच्या रंगमंचावर कोसळला. पुढं जे झालं ते माझ्या डोळ्यांच्या महासागरात न मावणारे होते…
खुर्चीवर बसलेल्या आबांचे पाय गच्चपणे पकडून त्यांच्या मांडीवर डोके ठेवून ओक्साबोक्शी रडणाऱ्या सुयशला आम्ही घरातले सगळे आ वासून बघत होतो. माझ्या दोन्ही मुलांना त्यांचा काका पहिल्यांदा दिसला, पण तोही अशा अवस्थेत!
भानावर आल्यावर सुयशने आबांकडे सगळा खुलासा केला.
“आबा रागाच्या भरात मी शर्मा अंकल सोबत आफ्रिकेला त्यांच्या हॉटेलमध्ये नोकरीसाठी गेलो खरा, पण तिथे जाऊन खरी परिस्थिती बघून भानावर आलो. मॅनेजर नव्हे तर, वेटर म्हणून काम करायचं होतं मला तिकडे… परतीचे दोर माझे मीच कापले होते. तेव्हा ठरवलं की, आपलं आयुष्य आपणच लढायचे आता. थोडे पैसे जमा झाल्यावर मी स्वतःचं छोटं हॉटेल सुरू केलं, जे आज अखेर तिथल्या नामांकित हॉटेल्समध्ये गणले जाते. हॉटेल बंद करताना रोज एक अपंग मुलगा उरलेले अन्न मिळेल, या आशेवर तिथे यायचा. एक दिवस न राहवून मी त्याला विचारलं, तेव्हा तो मला एका जुनाट घरी घेऊन गेला आणि त्याने त्याच्या वयोवृद्ध आजारी वडिलांची भेट घडवून आणली. तो म्हणाला, ‘मला खूप त्रास होतो, रोज त्यांच्यासाठी अन्नपदार्थ जमा करताना. पण ज्यांनी मला जन्म देऊन या जगात आणले, त्यांना समाधानाने आणि तृप्त मनाने या जगातून जाताना मला बघायचं आहे.’ मुलाची होणारी ओढाताण बघून देखील वडिलांच्या चेहऱ्यावर असलेले समाधान मला बरंच काही सांगून गेले. ते म्हणाले, ‘मी आजवर त्याच्यासाठी जे केलं त्याची जमेल तशी परतफेड तो करत आहे. पुढच्या जन्मी देखील मी यालाच माझा मुलगा म्हणून मागणार आहे देवाकडे. तू सुद्धा तुझ्या वडिलांना असंच सुखात ठेव…’ तो अपंग मुलगा इतकं काही करू शकतो, हे बघून मी आजवर जे गमावलं आहे, त्यासाठी माझी मलाच लाज वाटली. खूप वेळा वाटलं तुम्हाला आणि माईला येऊन भेटावं, पण नाही हिंमत झाली तुमच्यासमोर येऊन उभं रहायची… आबा तुमच्या कोणाचाही विश्वास बसणार नाही, अशी एक अद्भुत घटना गेल्या महिन्यात घडली. आबा तुम्ही आला होता माझ्या स्वप्नात एके दिवशी पहाटे. मला गच्च मिठी मारायला म्हणून, तुम्ही तुमचे दोन्ही हात माझ्या दिशेने केले होते. मी तुमच्याजवळ येणार इतक्यात तुम्ही दिसेनासे झालात आणि मला जाग आली. गेल्या वर्षी, दादाचा मित्र केतन मला अचानक भेटला होता अमेरिकेत, मी कामानिमित्त गेलो होतो तेव्हा. त्याने मला दादाचा मोबाइल नंबर हट्टाने दिला होता, तोच नंबर शेवटी उपयोगी पडला मला दादाला मेसेज करायला…”
हेही वाचा – सागरगोटे… आयुष्यातील चढ-उताराचे अन् सुख-दुःखाचे!
“आबा आता आपण जोडीने आपल्या नात्याचा पतंग तुमच्या आयुष्याच्या आकाशात तुम्हाला जमेल तेवढा उंच नेऊया. तो इतक्यात कटी पतंग होणार नाही, याची जबाबदारी आजपासून माझी…” त्याच्या डोक्यावर थरथरत्या हाताने थोपटत आबा म्हणाले, “तुझ्या वाटेकडे डोळे लावून बघत बघत आमच्या संसाराची फिरकी अर्धवट सोडून देऊन पुढे गेलेली तुझी माई हवी होती रे आज. पण हरकत नाही. जे असतं प्रारब्धात तेच घडत असते. उशिरा का होईना, पण डोळे बंद व्हायच्या आत आपली भेट झाली हे वर गेल्यावर तुझ्या माईला मी नक्की सांगेन.” आबा नंतर बरंच काही बोलले आणि ते ऐकून आम्ही सगळे निःशब्द झालो…
आजकाल आमच्या कॉम्प्लेक्सच्या विस्तीर्ण बागेत सुयश आबांना रोज सकाळ संध्याकाळ फिरवून आणतो. 30व्या मजल्यावरून त्या दोघांना एकत्र बघताना माझ्या मनात मात्र समाधानाचा पतंग उडत असते…


