सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय नववा
रश्मीचेनि आधारें जैसें । नव्हतेंचि मृगजळ आभासे । माझां ठायीं भूतजात तैसें । आणि मातेंही भावीं ॥85॥ मी ये परीचा भूतभावनु । परि सर्व भूतांसि अभिन्नु । जैसी प्रभा आणि भानु । एकचि ते ॥86॥ हा आमुचा ऐश्वर्ययोगु । तुवां देखिला कीं चांगु । आतां सांगें कांहीं एथ लागु । भूतभेदाचा असे ॥87॥ यालागीं मजपासूनि भूतें । आनें नव्हती हें निरुतें । आणि भूतांवेगळिया मातें । कहींच न मनीं हो ॥88॥
यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्रगो महान् । तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय ॥6॥
पैं गगन जेवढें जैसें । पवनु गगनीं तेवढाचि असे । सहजे हालविलिया वेगळा दिसे । एऱ्हवीं गगन तेंचि तो ॥89॥ तैसें भूतजात माझां ठायीं । कल्पिजे तरी आभासे कांहीं । निर्विकल्पीं तरि नाहीं । तेथ मीच मी आघवें ॥90॥ म्हणऊनि नाहीं आणि असे । हें कल्पनेचेनि सौरसें । जे कल्पनालोपें भ्रंशे । आणि कल्पनेसवें होय ॥91॥ तेंचि कल्पितें मुदल जाये । तैं असे नाहीं हें कें आहे । म्हणऊनि पुढती तूं पाहें । हा ऐश्वर्ययोगु ॥92॥ ऐसिया प्रतीतिबोधसागरीं । तूं आपणेयातें कल्लोळु एक करीं । मग जंव पाहासी चराचरीं । तंव तूंचि आहासी ॥93॥ या जाणणेयाचा चेवो । तुज आला ना म्हणती देवो । तरी आतां द्वैतस्वप्न वावो । जालें कीं ना ॥94॥ तरी पुढती जरी विपायें । बुद्धीसि कल्पनेची झोंप ये । तरी अभेदबोधु जाये । जैं स्वप्नीं पडिजे ॥95॥ म्हणोनि ये निद्रेची वाट मोडे । निखळ उद्बोधाचेंचि आपणपें घडे । ऐसें वर्म जें आहे फुडें । तें दावों आतां ॥96॥ तरी धनुर्धरा धैर्या । निकें अवधान देईं बा धनंजया । पैं सर्व भूतांतें माया । करी हरी गा ॥97॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जरी सोनें लेणें होऊनि घडे, तरी तयाचें सोनेपण न मोडे…
अर्थ
सूर्यकिरणांच्या आधाराने जसे मिथ्या मृगजळ भासते, त्याप्रमाणे प्राणिमात्र माझ्या ठिकाणी मृगजलवत् मिथ्या समज आणि मलाही सूर्यकिरणांप्रमाणे सत्य समज. ॥85॥ याप्रकारचा मी, जग या कल्पनेला आश्रय आहे. परंतु मी सर्व जगाहून वेगळा नाही, असा आहे. तो कसा तर, ज्याप्रमाणे सूर्य आणि सूर्याचा प्रकाश एकच आहे (त्याप्रमाणे सर्व प्राणी आणि मी एक आहे). ॥86॥ अर्जुना, हा आमचा ऐश्वर्ययोग तुला चांगला समजला ना? आता येथे महत्-तत्वापासून देहापर्यंतची तत्वे आणि मी यामधील भेदाचा संबंध आहे का? सांग. ॥87॥ याकरिता माझ्याहून सगळे प्राणी वेगळे नाहीत हे खास आणि मलाही प्राणिमात्राहून वेगळे मानू नकोस हो! ॥88॥
सर्वत्र संचार करणारा महान वायू आकाशाच्या ठिकाणी जसा नित्य स्थित आहे, त्याप्रमाणे सर्व भूते माझे ठिकाणी स्थित आहेत, असे जाण.॥6॥
परंतु आकाश जसे आणि जेवढे आहे, तसाच आणि तेवढाच वायू आकाशात असतो. सहज (पंखा) हलवून पाहिले तर, तो वेगळा दिसतो, नाहीतर आकाश आणि तो एकच आहे. ॥89॥ त्याप्रमाणे प्राणिमात्र माझ्या ठिकाणी काही कल्पिले तर भासतात आणि जर कल्पना केली नाही तर, ते नाहीतच; त्या ठिकाणी सर्व मीच मी आहे. ॥90॥ म्हणून भूतांचे (प्राणिमात्र) असणे आणि नसणे कल्पनेच्या योगाने होते. कारण की, भूताभास हा कल्पना नष्ट झाली की, तिजबरोबर नष्ट होतो आणि कल्पना उत्पन्न झाली की, तिजबरोबर उत्पन्न होतो. ॥91॥ ते कल्पना करणारे भूतच ज्यावेळी नाहीसे होते, तेव्हा भूतांचे असणे आणि भूतांचे नसणे, हा व्यवहार कोठून होणार? म्हणून तू आणखी या ऐश्वर्ययोगासंबंधी पुन्हा विचार कर. ॥92॥ अशा अनुभवरुपी ज्ञानसमुद्रामध्ये तू आपल्याला एक लाट कर; मग चराचरात जर तू पाहशील तर, तूच एक आहेस. (असे कळून येईल) ॥93॥ देव म्हणतात, अर्जुना, या ज्ञानाची जागृती तुला आली ना? जर आली असेल तर आता द्वैतस्वप्न मिथ्या झाले की नाही? ॥94॥ तरी पुन्हा जर कदाचित बुद्धीला कल्पनेची झोप येईल तर, अभेदज्ञान जाईल. त्यामुळे मग (कल्पनारूपी झोप लागल्यावर तू) द्वैतरूपी स्वप्नात (पुन्हा) पडशील. ॥95॥ म्हणून या कल्पनारूपी झोपेचा मार्ग मोडेल आणि आपण केवळ स्वरूप जागृतीरूपच होऊन जाऊ, असे जे एक वर्म आहे, ते आता तुला (उघड करून) दाखवतो. ॥96॥ तरी हे धैर्यवंत अर्जुना, बाबा चांगले लक्ष दे. अरे, सर्व प्राणिमात्रांना मायाच उत्पन्न करते आणि तीच त्यांचा नाश करते. ॥97॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : महदादि देहांतें, इयें अशेषेंही भूतें…


