अध्याय सातवा
अहंकाराचिया चळिया । वरि मदत्रयाचिया उकळिया । जेथ विषयोर्मीचिया आकळिया । उल्लाळ घेती ॥75॥ उदोअस्ताचे लोंढे । पाडीत जन्ममृत्यूचे चोंढे । तेथ पांचभौतिक बुडबुडे । होती जाती ॥76॥ सम्मोह विभ्रम भासे । गिळित धैर्याचीं आविसें । तेथ देव्हडे भोंवत वळसे । अज्ञानाचे ॥77॥ भ्रांतीचेनि खडुळें । रेवले आस्थेचे अवगाळें । रजोगुणाचेनि खळाळें । स्वर्गु गाजे ॥78॥ तमाचे धारसे वाड । सत्त्वाचें स्थिरपण जाड । किंबहुना हे दुवाड । मायानदी ॥79॥ पैं पुनरावृत्तीचेनि उभडें । झळंवती सत्यलोकींचे हुडे । घायें गडबडती धोंडे । ब्रह्मगोलकाचे ॥80॥ तया पाणियाचेनि वहिलेपणें । अझुनी न धरिती वोभाणें । ऐसा मायापूर हा कवणें । तरिजेल गा ॥81॥ येथ एक नवलावो । जो जो कीजे तरणोपावो । तो तो अपावो । होय तें ऐक ॥82॥ एक स्वयंबुद्धीचां बाहीं । रिगाले तयांची शुद्धीचि नाहीं । एक जाणिवेचां डोहीं । गर्वेंचि गिळिले ॥83॥ एकीं वेदत्रयाचिया सांगडी । घेतलिया अहंभावाचिया धोंडी । ते मदमीनाच्या तोंडीं । सगळेचि गेले ॥84॥ एकीं वयसेचें जाड बांधले । मग मन्मथाचिये कासे लागले । ते विषयमगरीं सांडिले । चघळुनियां ॥85॥ आतां वृद्धाप्याचिया तरंगा- । माजीं मतिभ्रंशाचा जरंगा । तेणें कवळिजताती पैं गा । चहूंकडे ॥86॥ आणि शोकाचां कडा उपडत । क्रोधाचां आवर्तीं दाटत । आपदागिधीं चुंबिजत । उधवलां ठायीं ॥87॥ मग दुःखाचेनि बरबटें बोंबले । पाठीं मरणाचिये रेवे रेवले । ऐसे कामाचिये कासे लागले । ते गेले वायां ॥88॥ एकीं यजनक्रियेची पेटी । बांधोनि घातली पोटीं । ते स्वर्गसुखाचां कपाटीं । शिरकोनि ठेले ॥89॥ एकीं मोक्षीं लागावयाचिया आशा । केला कर्मबाह्यांचा भरंवसा । परि ते पडिले वळसां । विधिनिषेधांचां ॥90॥
हेही वाचा – Dnyaneshwari : पैं गगनीं उपजे आभाळ, परि तेथ गगन नाहीं केवळ..
अर्थ
जिच्यामध्ये अहंकाराच्या मोठ्या धारा आहेत, त्यावर विद्यादि (विद्या, धन आणि कुल) तीन मदांच्या उकळ्या येतात आणि ज्या नदीमध्ये विषयरूपी लाटांवर लाटा उसळतात, ॥75॥ ज्या नदीमध्ये उदयअस्तांचे लोंढे जन्ममृत्यूरूप खळगे पाडतात आणि तेथे पंचमहाभूतांपासून झालेले शरीररूपी बुडबुडे होतात आणि जातात ॥76॥ (जिच्यात) अविवेक आणि गोंधळ हेच कोणी मासे, ते सात्विक धैर्मरूपी आमिष गिळतात आणि ज्या नदीमध्ये अज्ञानाचे भोवरे वक्रगतीने फिरतात ॥77॥ जिच्यात भ्रांतीच्या गढूळपणाने आशारूप गाळात प्राणी फसले आणि रजोगुणाच्या खळबळीने स्वर्ग गाजू लागला; ॥78॥ अशा या मायानदीत तमोगुणाची मोठी धार असते, सत्वगुणाचा स्थिरपणा गंभीर असतो. फार काय सांगावे? ही मायानदी तरून जाण्यास फार कठीण आहे. ॥79॥ तिच्या पुनर्जन्मरूप लाटांची उसळी सत्यलोकाच्या बुरुजांवर जाऊन आदळते आणि पुनरावृत्तीच्या आघाताने ब्रह्मांडाचे धोंडे कोसळून पडतात. ॥80॥ त्या पाण्याच्या वेगाने वाहात असलेला जोराचा पूर अद्याप थांबत नाही. असा हा मायेचा पूर कोण तरून जाईल? ॥81॥ या मायानदीसंबंधाने एकच आश्चर्य आहे, ते हे की, हिच्यातून तरून जाण्याला जो जो म्हणून उपाय करावा, तो तो अपायच होतो. तो प्रकार कसा, ते ऐक, ॥82॥ कित्येक आपल्याच बुद्धिरूपी बाहूने ही नदी तरून जाण्याकरिता या नदीत शिरले, ते कोठे गेले त्यांचा पत्ताच नाही. दुसरे कित्येक (मायानदीत) ज्ञानाच्या डोहामध्ये अभिमानाने गिळले गेले. ॥83॥ कित्येकांनी तीन वेदरूपी होडीचा (मायानदीतून तरण्याकरिता) आश्रय घेतला, पण त्याबरोबरच अभिमानाचे मोठे धोंडे घेतले, ते मदरूपी माशांच्या तोंडात संबंध गेले. ॥84॥ किती कित्येकजणांनी तारुण्यरूपी कासपेटा कमरेस बांधला आणि मग मदनाच्या कासेला लागले, ते विषयरूपी मगरींनी चघळून टाकले. ॥85॥ आता म्हातारपणरूपी लाटेमध्ये असणार्या बुद्धिभ्रंशरूपी जाळ्याने ते चोहोबाजूंनी व्यापले जातात. ॥86॥ आणि शोकरूपी काठावर आपटून, क्रोधरूपी भोवर्यात गुरफटून, ज्या ठिकाणी वर येतात, त्या ठिकाणी संकटरूपी गिधाडांकडून टोचले जातात. ॥87॥ नंतर ते दु:खरूपी चिखलाने भरले आणि मग मरणाच्या गाळात फसले. याप्रमाणे ज्यांनी कामाचा आश्रय केला, ते असे व्यर्थ गेले. ॥88॥ कित्येकांनी मायानदी तरण्याकरिता यज्ञक्रियारूपी पेटी आपल्या पोटाशी बांधली, ते स्वर्गसुखाच्या कपारीमध्ये अडकून राहिले. ॥89॥ कित्येकांनी मोक्षरूपी पलीकडच्या किनार्याला लागावे, या आशेने कर्मरूपी बाहूंवर विश्वास ठेवला, परंतु ते विधिनिषेधांच्या वळणात सापडले. ॥90॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जिये ब्रह्माचळाचां आधाडां, पहिलिया संकल्पजळाचा उभडा…


