स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये डोसा किंवा इडलीचे पीठ उरले तर काय करायचे? तसेच शिळ्या भाताचे काय करायचे, याच्या काही टीप्स पाहूयात –
- डोसा किंवा इडलीचे वाटलेले पीठ थोडे उरले असेल तर त्यात थोडे हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे, मीठ, जिरे मिक्स करावे. नंतर गॅसवर एका कढईत थोडे तेल तापवून त्यात वरील मिश्रण घालावे आणि वर झाकण ठेवावे. पाच ते सहा मिनिटांनंतर झाकण काढून मिश्रण उलटे करावे आणि परत झाकण ठेवून 1 मिनिट होऊ द्यावे. नंतर लोणच्याबरोबर ही मोठी इडली गरम गरम खावी. फार छान लागते.
- एखाद्या वेळेस हिरव्या मिरच्या जास्त प्रमाणात आणल्या गेल्यास किंवा उरल्यास कोथिंबिरीचा जो छिद्रांकित डबा असतो त्यात किंवा एका डिशमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवावे. आठ-दहा दिवसांनंतर मिरच्या चांगल्या सुकतात, मात्र रंग हिरवाच राहतो. त्यात थोडे मीठ घालून मिक्सरमध्ये बारीक करावे आणि ही बारीक हिरवी मिरची पूड आयत्या वेळी चटकन वापरता येते. वास आणि स्वादही हिरव्या मिरचीचाच येतो.
हेही वाचा – Kitchen Tips : कोथिंबीर वडी, अळुवडी आणि केक करताना….
- साधारणपणे चकलीचे पीठ तयार करताना त्यातील मुख्य घटक – तांदूळ, चण्याची डाळ आणि उडदाची डाळ 4:2:1 या प्रमाणात घेतली जातात; परंतु या परंपरागत प्रमाणापेक्षा चार वाट्या तांदळास दीड वाटी प्रत्येकी चण्याची व उडदाची डाळ घ्यावी. अशा पिठाच्या चकल्या फारच खुसखुशीत आणि हलक्या होतात. एक एक धान्य धुऊन, उपसून लगेच पाच-सात मिनिटांनी भाजायला घ्यावं. भाजत आलं आहे असं वाटलं की, एक-दोन दाणे तोंडात टाकून पाहावे. चावल्याबरोबर पटकन भुगा झाल्यास छान भाजले गेले आहे, असे समजावे आणि लगेच ताटात काढावे. धणे- जिरे कढईत न भाजता गरम डाळ-तांदळात दडपून ठेवावे. बेताचे आणि कोमट मोहन घालून आधी पिठावर थोडंसं गरम पाणी ओतून ढवळावे आणि मग गार पाण्याने मळावे.
हेही वाचा – Kitchen Tips : घरात पातळ पोहे पाहिजेतच… कॉर्नफ्लोअरचा असाही उपयोग
- आपल्याकडे बऱ्याच वेळा भात उरतो. कांदा, दाणे घालून अगर नुसता फोडणीचा भात करण्यात येतो. भातवड्याला शिळा भात लागतो. कारण तो कोरडा असतो. असा शिळा भात मोकळा करून, त्यात बेताचे डाळीचे पीठ आणि प्रमाणशीर दाण्याचे कूट, तसेच योग्य प्रमाणात तिखट, मीठ आणि हळद घालावी. थोडे पाणी टाकून त्याचा गोळा तयार करावा. साबुदाण्याचे वडे करतो, त्या आकाराचे वडे करून, तव्यावर थोड्या तेलात खरपूस परतावेत. तेलाची बचत तर होतेच, पण सर्वांत कमी खर्चाचा, खमंग, चविष्ट आणि रुचकर पदार्थ तयार होतो. हे वडे तेलकट लागत नाहीत. या भातवड्याबरोबर कोणत्याही चटणीची जरुरी भासत नाही.


