डॉ. प्रज्ञावंत देवळेकर
सकाळी एक महाशय मान दुखतेय म्हणून ओपीडीत आले होते; जनरल केस टेकिंगचा भाग म्हणून त्यांना “तुम्ही काय काम करता?” विचारलं तर त्यांनी “मी गृहस्थ आहे,” असं उत्तर दिलं… मी प्रश्नार्थक नजरेनं बघितलं तेव्हा, “मी काहीच काम करत नाही, घरीच असतो… त्यामुळे गृहस्थ!” असं उत्तर त्यांनी दिलं. वास्तविक, काहीच काम न करणं हेही एक प्रकारचं कामच असतं. म्हणून त्यांना शेड्यूल विचारलं तर, “बायको मेस चालवते अन् अगदी कुणी नसेलच मदतीला तर मी अधूनमधून डबे पोहोचवतो…” असं उत्तर त्यांनी दिलं. या कामात वाकणं, वजन उचलणं, टू-व्हीलर चालवणं… या कामांमुळं मानेच्या स्नायूंवर ताण येत असावा, त्यामुळे त्यांना मसल रिलॅक्संट देत रवाना केलं..
अनेकांना “तुम्ही काय करता?” हा प्रश्न ऑफेंडिंग किंवा अनाठायी वाटू शकतो, पण यामुळं आजाराची कारणमीमांसा करायला मदत होते एवढंच…
सतराव्या शतकात तर, वैद्यकशास्त्र आणि यासंबंधित सेवा-सुविधा केवळ श्रीमंतांसाठी आणि राजघराण्यांसाठी होती. गावोगाव, गल्लीबोळात काम करणाऱ्या लोकांना जुगाड उपचार करावे लागत, वेळ असेल तरच एखादा हकिम किंवा वैद्य त्यांना सल्ला देत असे, तेही जुजबी का होईना मोबदला दिला तर!
या साऱ्या भाऊगर्दीत इटलीतील कार्पी या गावचा ‘बेनार्दिनो रामाझिनी’ नामक जिज्ञासू, विचारी आणि महत्त्वाचं म्हणजे संवेदनशील असणारा एक वैद्य पुढं आला… बेनार्दिनोनं पार्मा विद्यापीठातून आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं होतं, इतर सहाध्यायी आपापली बग्गी घेऊन जेव्हा श्रीमंत रुग्णांकडं वळले, तेव्हा हा पठ्ठ्या पायी बाजारात, रस्त्यानं, गल्लीबोळात, खाणी-गिरण्यांमधून पायीच फिरू लागला…
तो प्रत्येक रुग्णाला एक वेगळाच प्रश्न विचारायचा – “क्यूंई सीत आर्स एक्सर्सेंदा?”
म्हणजे “तुम्ही काय काम करता?”
हेही वाचा – Japanese story : मला ‘शांती’ हवी!
यामागं, “माणसाचं कामच त्याच्या आजाराचं मूळ असतं,” अशी त्याची पक्की धारणा होती. या सगळ्या पायपिटीतून त्यानं एक ग्रंथच लिहिला “दू मोर्बिस आर्टिफिकम डायट्रिबा” अर्थात कामगारांच्या आजाराविषयी चर्चा… या ग्रंथात त्यानं तब्बल 54 व्यवसायजन्य आजारांचं यथोचित वर्णन केलं, जसं ‘खनिक’ म्हणजे खाणकामगारांना धुळीमुळं होणारे फुफ्फुसांचे आजार… ‘मुद्रक’ म्हणजे छापखान्यात काम करणाऱ्यांना पारा आणि शिसे यांच्या संपर्कात आल्यानं होणारे आजार… शिंपी मंडळींची पाठदुखी… दायांचा थकवा वगैरे…
बेनार्दिनोचं हे विचारचक्र त्या काळासाठी अतिशय आधुनिक होतं; यासाठी त्यानं काही साधे पण प्रभावी प्रतिबंधात्मक उपायही सुचवले यावरून प्रतिबंधात्मक वैद्यकाचा पाया रचला गेला.. त्यानं सांगितलं, कामाच्या जागी हवा खेळती असावी, वेळोवेळी विश्रांती घ्यावी, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या महत्त्वाच्या बाबी आहेत तसंच, घातक धातू-विषद्रव्ये यांचा थेट संपर्क टाळावा, शारीरिक श्रमांइतकाचा मानसिक ताणही शरीराला मारक ठरतो…
हेही वाचा – विलोजब्रुकमधील वेदनांचे हुंकार
त्याच्या या मूलगामी चिंतनावरच पुढच्या औद्योगिक क्रांतीनंतर कामगार सुरक्षेचे कायदे तयार झाले! कारखान्यांमध्ये वायूविजन, सुरक्षा साधनं आणि कामाच्या वेळांचे नियम आले!
आज जेव्हा कोणताही डॉक्टर रुग्णाला विचारतो, ”तुम्ही काम काय करता?” तेव्हा तो बेनार्दिनोची विचार पुनः उच्चारत असतो…
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखांचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


