डॉ. विवेक वैद्य
मागच्याच आठवड्यातली गोष्ट. नवराबायको एक लहान 6-7 वर्षांच्या मुलाला घेऊन माझ्याकडे आले. मुलगा सिनियर केजी किंवा फर्स्ट स्टॅंडर्डमध्ये असावा. मुलगा चुणचुणीत होता. दोघे नवराबायको एकमेकांशी मराठीत बोलत होते तर, मुलाशी हिंदीत बोलत होते. मला काही समजेना!?
“हा मुलगा तुमचा आहे?”
“हो… आमचाच आहे!” नवरा म्हणाला. पत्नीने ‘एवढेही समजत नाही,’ असा रागीट कटाक्ष टाकला.
“तुमच्यासोबत राहतो? की मामाकडे?”
नंदुरबारहुन मध्य प्रदेश जवळ आहे. सेंधवा… पानसेमल… तिथे मामा राहत असेल तर, तो हिंदी बोलत असेल.
“नाही. आमच्यासोबतच राहतो. का विचारताय असे?”
“तुम्ही मराठी भाषिक असून त्याच्याशी हिंदीत बोलताय म्हणून विचारतोय…”
“ते होय. तो इंग्लिश मीडियमच्या शाळेत जातो म्हणून!”
हेही वाचा – सुख सुख म्हणजे काय असतं?
“मग?” इंग्लिश मीडियमच्या शाळेत जातो तर, त्याच्याशी हिंदीत का बोलावे लागते, हे मला कळेना.
“अहो, वैद्य सर, तिथे त्याच्याशी त्याचे सगळे टीचर हिंदीत बोलतात…”
“बोलू द्या. पण तुम्ही का त्याच्याशी हिंदीत बोलताय?”
नवऱ्याने माझ्याकड एक कीव येणाऱ्या नजरेने पाहिले… “अहो, तो घरी आला की, हिंदीत बोलतो म्हणून आम्हीही त्याच्याशी हिंदीत बोलतो.”
मी मनातल्या मनात कपाळावर हात मारला. त्यांना म्हणालो, “अहो, या वयात मुलांची आकलनशक्ती जबरदस्त असते. तुम्ही घरी त्याच्याशी मराठीत बोललात तर, तो इंग्रजी, हिंदी आणि मराठी तिन्ही भाषा उत्तम बोलू शकेल… त्याला काही अडचण येणार नाही!”
“ठीक आहे,” नवरा बोलला, पण त्यात काही जोर नव्हता…
मला एकदम उत्साह आला… “अहो, आम्ही इथे मराठीच्या संवर्धन आणि प्रचारासाठी प्रयत्न करतोय… त्यासाठी संमेलन आयोजित करतोय आणि मराठी मातृभाषा असताना तुम्ही खुशाल मुलाशी हिंदीत बोलताय. काही दिवसांनी काय होईल माहिती आहे का?”
“काय होईल?” त्याने घाबरून विचारले.
हेही वाचा – गोष्ट कैकेयी आणि मंथराची… अमोल आणि सुशीलाची सुद्धा!
“अहो, सारखे सारखे मुलाशी हिंदी भाषेत बोलून तुम्ही दोघेही एकमेकांशी हिंदीत बोलायला लागाल. मुलगा कसे मराठी शिकणार मग? त्यात पुढे जाऊन तुम्ही दुसरा चान्स घ्याल… घ्याल का नाही?” माझी गाडी आता सुपरफास्ट…
“हो, हो… म्हणजे तसा विचार आहे पण…”
“तोपर्यंत तुम्ही पक्के हिंदी भाषिक व्हाल आणि दुसऱ्या मुलाला त्याची आई अंगाई गाउन झोपवायच्या ऐवजी ‘लोरी सुनायेगी…’ म्हणजे एकंदर चार मराठी भाषिक कमी होणार… बरोबर की नाही?”
“हो म्हणजे… नाही म्हणजे…” तो पुरता गांगरला.
“तर, आता लक्षात ठेवा. मुलाशी मराठीतच बोला. समजले?”
“समजले…” तो घाईगडबडीत उठत म्हणाला.
“येतो आम्ही…” ते गेल्यावर मला जरा बरे वाटले. चला, मराठीसाठी काही योगदान तर दिले! मग एकदम क्लिक झाले… अरे, ते कशासाठी आले होते, हे तर आपण विचारलंच नाही… म्हणजे एक रुग्ण आपण गमावला!


