Sunday, March 8, 2026

banner 468x60

Homeललितआराध्याच्या घरात एकीकडे अध्यात्म तर दुसरीकडे कटकारस्थान…

आराध्याच्या घरात एकीकडे अध्यात्म तर दुसरीकडे कटकारस्थान…

प्रणाली वैद्य

भाग – 11

शांताबाईंनी एक खोल श्वास घेतला आणि सुमित्रा आजीकडे पाहून हलकं हसल्या, “मी येईन तुमच्यासोबत. पण एक अट आहे — तिथे मला आराध्यालाही न्यायचंय.”

सुमित्रा आजी क्षणभर स्तब्ध झाल्या, आणि मग त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधानाचं हसू उमटलं… “तिला न्यायचंच… अग मीच म्हणणार होते आराध्याला सोबत घेऊन चल… माझ्या मनातलं तुझ्या तोंडी आलं. मलाच खूपच आनंद झाला हे ऐकून. अगदीच योग्य जागा आहे तिच्यासाठी.” हे बोलताना त्यांच्या नजरेत काहीतरी जाणून असल्यासारखा एक भाव होता…

आज घरात एक वेगळंच शांत, पवित्र वातावरण निर्माण झालं होतं… सुमित्रा मावशींच्या ओजस्वी आवाजात आणि त्यांच्या शब्दांमधून उमटणाऱ्या श्रद्धेमुळे घरातल्या प्रत्येकालाच एक अनामिक भारावलेपण जाणवत होतं. तेवढ्यात त्यांनी सहज बोलता बोलता विषय काढला —

“माझे गुरु, दादा…!”

आणि मग त्या त्यांच्या आठवणींच्या ओंजळीतून मोती उधळू लागल्या.

“दादा, जेव्हा आमच्याकडे वास्तव्याला यायचे ना, तेव्हा घरचं वातावरण वेगळंच असायचं. सकाळी उठून सर्वांनी एकत्र ध्यानात बसायचं… घरभर सुगंध दरवळायचा. दादांचं बोलणं ऐकणं म्हणजे आत्म्याशी संवाद साधल्यासारखं वाटायचं…”

आराध्या शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होती, आणि तिच्या मनात नकळत शिवाची आठवण जागी होत होती… “त्याच्या डोळ्यांमध्येही असंच काहीसं होतं… खोल, स्थिर, आणि शांत!”

सुमित्रा मावशींचं बोलणं चालूच होतं —

“आमच्या घरी सण असो वा उपवास, दादांचं मार्गदर्शन असायचंच. कोजागरीला संपूर्ण अंगणात दीप मांडून देवीचं आवाहन व्हायचं… होळीच्या दिवशी अग्नीजवळ दादांचे शब्द ऐकताना कधी डोळे ओलावलेले असायचे, हे आपल्यालाही उमजायचं नाही.”

हेही वाचा – आराध्या घरी परतली, पण एका निर्धाराने!

आजी त्या क्षणी खूप आनंदात होत्या. त्या आणि सुमित्रा मावशी जुन्या गोष्टींमध्ये रमल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर वय विसरायला लावणारी चमक होती. त्या दोघींच्या आठवणींमध्ये केवढं भरलेलं आयुष्य होतं, आणि ते ऐकताना आराध्याला एक वेगळच समाधान मिळत होतं.

सुमित्रा मावशी म्हणाल्या,

“आजही आमचं कुटुंब दादांच्या शिकवणुकीवर चालतं. सण असो की, अडचण, सर्वजण एकत्र बसतो, चर्चा करतो, आणि निर्णय घेतो. दादांनी आम्हाला दिलेली एकोप्याची शिकवण, तीच आजही आमचं खऱ्या अर्थानं पाठबळ आहे.”

आराध्या विचारात गुंग झाली होती. तिला जाणवत होतं की, तिच्या आयुष्यात जे गुंतागुंतीचे प्रश्न आहेत, त्यांना उत्तरं कदाचित याच अध्यात्मिक शांतीमध्ये सापडतील…

त्या संध्याकाळी घरात फक्त शब्द नव्हते… त्या शब्दांत अनुभव होते, श्रद्धा होती आणि एका गूढ अध्यात्मिक प्रवासाची हाक होती… जी आता आराध्याच्या मनालाही ऐकू येत होती. सगळं घर सुमित्रा मावशींच्या शब्दांनी भारलेलं होतं. शांतपणे बसलेले चेहरे, हरवलेल्या नजरा आणि मनात खोलवर झिरपत जाणाऱ्या आठवणींनी वातावरण अगदी जादूई झालं होतं. आराध्या, प्राजक्ता, आजी या सगळ्यांनीच जणू काही वेळ विसरूनच टाकला होता… ते कुठे आहेत, कोण आहेत, याचे विस्मरण होऊन फक्त त्या गुरूंच्या आणि त्यांच्या शिकवणींच्या कथा ऐकण्यात ते हरवून गेले होते.

तेवढ्यात दार उघडल्याचा आवाज आला… सुशांत ऑफिसवरून थेट घरी परतला होता. त्याच्या चेहऱ्यावर ऑफिसमधल्या थकव्याची झाक होती, पण घरातलं वातावरण वेगळंच वाटत होतं. तोही विचारात पडला — “इतका शांतपणा कधी असतो का घरी?”

तो सोफ्यावर बसला. सगळ्यांचं लक्ष सुमित्रा मावशींकडे होतं, आणि बोलणं अजूनही सुरूच होतं. काही वेळ तोही ऐकत बसला… आणि त्यालाही त्या गोष्टींनी हळूहळू खेचून घेतलं. सुमित्रा मावशींचं बोलणं थांबलं आणि त्या एकदम त्याच्याकडे वळल्या…

“सुशांत… तुझ्या आई आणि लेकीला काही दिवसांसाठी माझ्यासोबत घेऊन जाते चालेल ना? फक्त दोन-चार दिवस…”

“आमच्या  घरी घेऊन जाईन. दादांच्या भेटीला  घेऊन जाईन तिकडे खूप काही अनुभवायला मिळेल. शांत, निसर्गाच्या सानिध्यात… आणि थोडा अध्यात्मिक स्पर्शसुद्धा!”

क्षणभर सुशांत गोंधळला… पण मग त्याने आपल्या आईकडे पाहिलं — प्राजक्ताच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित होते. आराध्या अगदी शांत चेहऱ्याने मावशींकडे पाहत होती, तिच्या डोळ्यांत मात्र जाणवणारी चमक सुशांतच्या लक्षात आली.

“हो… का नाही? नकार देण्याचा प्रश्नच नाही,” तो हसून म्हणाला, “आई आणि आराध्या दोघींनाही थोडं वेगळं अनुभवायला मिळेल… आणि त्याची गरजही आहे.”

मावशींच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. आजची संध्याकाळ फक्त गप्पांची नव्हती… तो एक प्रारंभ होता… एका नव्या प्रवासाचा, जे आराध्याच्या आयुष्यात अजून काही नवे वळण घेऊन येणार होता…

आत घरात एक वेगळंच चैतन्य भरून राहिलं होतं. सुमित्रा मावशींचं प्रसन्न अस्तित्व, त्यांच्या अनुभवांनी गुंफलेली कथा, आणि सुशांतचा दिलेला होकार… सगळंच वातावरण भारावलेलं होतं. पण ह्या प्रसन्नतेच्या सावलीत एक कोपरा मात्र अंधारलेला होता… निशाचा!

तिचं मन उफाळून आलं होतं. सगळं ऐकून तिला जणू झिणझिण्याच आल्या होत्या. तिचा चेहरा चिडका, डोळ्यांतून राग खळवळत होता. बाहेरून नुकतीच आलेली अन्वी दारातून आत येणार इतक्यात निशा पटकन उठली… “चल… चल आत ये पटकन,” म्हणत तिने अन्वीचा हात धरून तिला सरळ आपल्या खोलीत ओढलं  आणि दरवाजा लावून घेतला.

“हे बघ अन्वी… ही म्हातारी ना, अगदी वेड्यांच्या वरताण आहे. बघतेयस ना, सगळे तिच्याकडून काही चमत्कार असल्यासारखं ऐकत बसलेत…”

तिच्या आवाजात उपहास आणि संताप दोन्ही मिसळलेले होते. अन्वी अजून काही बोलणार, तोच निशा पुन्हा बोलायला लागली, “चल बाई! त्या आराध्याला घेऊन जाणार असतील तर घेऊन जावोत. तीच आहे सगळीकडे पुढे पुढे करणारी! स्वतःला खूप मोठी समजते… कुठेही चिटकून बसते… जणू चिपकूच आहे. काळी कलुटी… आईसारखीच! कोणी विचारत नाही तिला, तरी मधे मधे घुसते… आणि वर कामाला येते जशी कामवाली!”

निशाचे शब्द आता झणझणीत टोचणारे होते. तिच्या मनात आराध्याबद्दल असलेल्या तिरस्काराने ती कुठे थांबते आहे, हेच समजेनासं झालं होतं. अन्वी मात्र गप्प होती. ती देखील आतून अस्वस्थ होती. कॉलेजचा रिझल्ट, आराध्याच्या यशावर घरचं कौतुक आणि आता हे सगळं अध्यात्मिक वलय — तिला स्वतःचं अस्तित्व खुजं वाटायला लागलं होतं. निशा तिला समजावत म्हणाली,

“बघ, हे सगळं टाळ-कुटणं काही उपयोगाचं नाही. काम कर, नाव काढ, पैसा मिळव — हीच खरी शिदोरी. देव देव करणारे कधीच पुढं जात नाहीत आणि आपल्याला पुढं जायचंय… समजलीस?”

अन्वीने केवळ मान डोलावली, पण तिच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं…

त्या खोलीतल्या कुडमुडीत वातावरणात एक सावध कट शिजत होता — जिथे असूया, अहंकार, आणि असमाधान यांचं थैमान सुरू होतं!

तर दुसरीकडे घराच्या हॉलमध्ये आराध्या, तिची आई प्राजक्ता, आजी आणि सुमित्रा मावशी… अध्यात्माच्या रंगात रंगून गेले होते.

निशाच्या मनात आधीच ठरलं होतं — आराध्यासाठी कोणतीही संधी, कोणतंही कौतुक नको. अन्वीच्या मनात विष कालवायला तर ती कायम तत्परच होती. तिच्या डोक्यातून सुमित्रा मावशींबरोबर आराध्या आणि सासूच्या जाण्याचा विचार काही केल्या उतरायला तयार नव्हता. आता पुढचा डाव ती अन्वीच्या मनात भरवून टाकणार होती.

हेही वाचा – आराध्याच्या गुणांची कदर कोणीतरी केली होती!

रात्री जेवणं आटोपल्यावर निशा आणि अन्वी खोलीत एकत्र बसल्या होत्या. बाहेर आजी आणि सुमित्रा मावशी गप्पा मारत बसलेल्या. निशा हळूच  अन्वीजवळ सरकली आणि म्हणाली, “बाळा, एक लक्षात ठेव… त्या आजी तुला विचारतीलच — येतेस का म्हणून. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेव, सरळ सांगायचं, ‘माझे आधीच प्लॅन्स ठरलेत… कसलं ते गुरुकुल, कसलं ते ध्यान, काय उपासना… हे सगळं कामवाल्या लोकांसाठी असतं. तू तुझं जीवन राणीसारखं जगायला हवं…”

अन्वी विचारात पडली, काही बोलायच्या आतच निशा पुढे म्हणाली… “तू कामवालीच्या मुलीसारखी वागू नकोस. आराध्यासारखं फुकट काम करत हिंडायचं नाही. तू बसून ऑर्डर देणारी होशील — हाताखालच्यांना काम करवणारी!”

अन्वीचं मन क्षणभर गोंधळून गेलं. आईच्या शब्दांत ‘राज्य’ करण्याचं स्वप्न होतं, पण त्यात कुठेतरी असूया, आकस आणि आराध्याविषयीचा तिरस्कार मिसळलेला होता. निशा पुन्हा म्हणाली, “कोणी विचारलं की म्हणायचं, माझे क्लास आहेत, प्रोजेक्ट्स आहेत, मी जाऊ शकत नाही. आणि हो… त्या आराध्यासारखं गोंधळ घालायचं नाही. तिनं किती गुण मिळवलेत ते कौतुकाचं नाही… तिचं मार्क मिळवणं तेच सगळ्यांना दिसतंय. पण काही दिवस थांब… तू काय आहेस हे सगळ्यांना दाखवून दे!”

अन्वी शांत होती, पण तिच्या डोळ्यांत एक विचित्र चमक होती. तिच्या मनात एक कट शिजत होता — आराध्या जणू तिच्या आयुष्याची सावली बनून राहिलीय आणि आता ती सावली पुसून टाकण्याची वेळ आली होती…

त्या रात्री, खोलीच्या चार भिंतींमध्ये एक नकारात्मक विचारधारा खोलवर रुजत होती… आणि भविष्यात एक वादळ नक्कीच काहीतरी बदलून टाकणार होतं…

क्रमशः


काय असेल ते वादळ? कसं असेल?  आणि काय बदल होईल त्यातून…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!