शोभा भडके
भाग – 10
सकाळी नेहमीच्या वेळेत उठून शिवने आपलं आवरलं आणि तयार होऊन ऑफिसला जायला निघाला. त्याने आकाशला कॉल करून आजच्या कामाच्या डिटेल्स मागून मीटिंगची तयारी करायला सांगितली. ब्लेझर अंगावर चढवून, तो हातात वॉच घालत होता, तोच दारावर टकटक झाली… आणि त्यापाठोपाठ सिया आत आली…
“दि… ये ना…” शिव तिच्याजवळ जात तिला आत घेऊन आला.
खरंतर, त्याला तिच्याशी बोलायचं होतं रात्रीच! पण तिला वेळ द्यायला हवा, असा विचार करून त्याने बोलणं टाळलं होतं. पण आता ती स्वतःहूनच आली होती… तसं तर त्याला ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग होती, पण या वेळेला दीपेक्षा महत्त्वाचं काहीच नव्हतं…
“हां बोल ना दि, काही बोलायचं होतं का?” त्याने तिला सोफ्यावर बसवलं. तो तिच्या शेजारी बसला. ती त्याच्याकडे पाहात डोळ्यात पाणी आणून म्हणाली, “तू माझ्यासाठी रामच्या बहिणीसोबत लग्न करायला तयार झालास? एवढं प्रेम करतोस माझ्यावर की, तुझ्या आयुष्याचा एवढा मोठा निर्णय असा काहीही विचार न करता घेऊन मोकळा झालास?!”
“मी तुझ्या सुखासाठी काहीही करू शकतो… काहीही! पण माहीत नाही का, हे एकच कारण आहे असं नाही दि… पण मी तिथे पोहोचलो तेव्हा रामच्या चेहऱ्यावर जी हतबलता पाहिली ना… आपल्या बहिणीसाठी काहीही न करू शकण्याची! तिथे लोक त्याच्या बहिणीवर आरोप करत होते… तो जीव तोडून सांगत होता, ती निर्दोष आहे… पण कोणीही ऐकायला तयार नव्हतं… तिच्या लग्नाची चर्चा करत होत… त्याच्याकडे पाहून मला माझीच अवस्था जाणवली. जेव्हा तुला गरज होती, तेव्हा काहीही करू न शकण्याची… आणि म्हणून मी काहीही न विचार करता, लग्न करेन असं सांगून मोकळा झालो. पण दि डोन्ट वरी, मी तुला फोर्स नाही करणार… या वेळी तुझ्या आयुष्याचा निर्णय तूच घे… मी आहे तुझ्यासोबत! पण हो, मी शब्द दिलाय तर, मी हे लग्न करणार… बस्स, त्यांच्या होकाराची वाट पाहतोय… त्यांचा होकार आला की, मी सगळ्यांना सांगेन…”
त्याने आपल्या मनातलं सगळं सियाला सांगून टाकलं!
त्या न पाहिलेल्या न भेटलेल्या मुलीसाठी त्याच्या मनात कणव निर्माण झाली होती. तो एक भाऊ म्हणून त्याच्या बहिणीचं आयुष्य बरबाद होण्यापासून वाचवू शकला नव्हता… पण कदाचित देवाने त्याला संधी दिली होती अन् ती संधी आरू होती. जिच्याशी लग्न करून तो तिला सुरक्षित करणार होता!
“आरू खूप गोड मुलगी आहे शिव. पण लहान आहे रे ती… पण तू घेशील तिला सांभाळून ही पण खात्री आहे मला!” सिया त्याच्या गालावर हात ठेवून म्हणाली.
“आरू?” त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या…
“जिच्यासोबत लग्न करणार आहेस तिचं नावही माहीत नाही तुला?” सियाने मिश्किलपणे हसत विचारले.
“दि!” तोही गालात हसला.
“बरं चल, जा तू ऑफिसला… त्यांचा कॉल आल्यावर बघू पुढे काय करायच ते!” सिया त्याला ‘बाय’ करून गेली. तो पण लेट झाला होता म्हणून नाश्ता न करताच ऑफिसला गेला.
“सिया…” ती आवरून बाहेर जात होती, तोच मागून तिच्या बाबांनी तिला आवाज दिला.
“अं… हां, बाबा, बोला ना काय झालं?” ती मागे वळत म्हणाली.
“कुठे बाहेर जातेयस का?” तिच्या जवळ येत ते म्हणाले. आज त्यांच्या बोलण्यात सॉफ्टनेस होता.
“हो… मैत्रीणीकडे जात होते. काही काम होतं का तुमचं?” सिया.
“हं… चल सोबत जाऊ, मी सोडतो तुला…” ते म्हणाले तसं ती त्यांच्या तोंडाकडे पाहू लागली. आजपर्यंत ते एवढं प्रेमाने कधीच बोलले नव्हते! त्यांचं तिच्यावर प्रेम नव्हतं असं नाही, पण एक बाप म्हणून ते नेहमी आपल्या मुलांसोबत कडक वागत आलेले…
“हो, चला” ती गोंधळत म्हणाली आणि त्यांच्यासोबत गेली.
मागे सुधा त्यांना सोबत जाताना पाहात होत्या, त्यांच्या डोळ्यांत पाणी जमा झालं होतं… कदाचित आता सर्व ठीक होईल, अशी आशा निर्माण झाली होती त्यांच्या मनात.
“होईल सगळं नीट. त्या देवाला काळजी आहे गं,” त्यांच्याजवळ येत आजी म्हणाल्या.
“हो आई, त्यांनी फक्त सियाला व्यवस्थित समजावून सांगावं आणि ती लग्नाला तयार व्हावी, अशी मागणी त्या देवाकडे…” सुधा हात जोडत म्हणाल्या.
इकडे शिव ऑफिसमध्ये पोहचला होता. नुकतीच मीटिंग संपवून तो त्याच्या केबिनमध्ये येऊन बसला आणि त्याने, कॉल करून जीवन आणि आकाशला बोलवून घेतलं. दोघं त्याच्यासमोर हजर झाले.
“जीवन तुला मी राम आणि त्याच्या बहिणीची सगळी माहिती काढायला सांगितली होती आणि ते प्रकरण काय आहे, ते पण शोधायला सांगितलं होतं… काम झालं?” चेअरवर रेलून बसलेल्या शिवने हातातील पेन फिरवत विचारलं.
“येस सर! मी माहिती काढली आहे सगळी…” जीवन म्हणाला.
“बोल, खरंच त्या मुलीचं प्रेम प्रकरण वगैरे आहे?” आकाशने विचारलं. खरंतर, आकाशला शिवचा हा निर्णय अजिबात आवडला नव्हता आणि सियाचंही लग्न रामसोबत होऊ नये, असं वाटत होतं. या ऐशोआरामात राहिलेली सिया कशी तिथे अडजस्ट करणार? म्हणूनच अंकलने त्यावेळी विरोध केला होता, हे पटलं होतं… तो प्रॅक्टिकल विचार करत होता… आणि जर रामच्या बहिणीचं प्रेम वगैरे असेल तर शिव स्वतःच माघार घेईल.
“नो सर, असं काहीच नाही. गावातील एक मुलगा त्यांच्या मैत्रिणीला त्रास देत होता तर, तिने त्याच्या थोबाडीत मारली होती. त्याचाच बदला घेण्यासाठी त्या मुलाने फोटो एडिट करून अशा प्रकारे बनवला की, कोणालाही वाटेल ते कपल आहे… आणि हो सर, राम म्हणजेच तिच्या भावाने या सगळ्याचा शोध पण घेतला आणि त्या मुलाला अशी शिक्षा दिलीय की, तो परत कुठल्याही मुलीसोबत असं वागणार नाही. पण तो फोटोमधला मुलगा कोण आहे? ते नाही कळलं,” जीवनने त्याला कळलेलं सगळं सांगितलं.
शिवला ते सगळं ऐकून समाधान वाटलं की, तिचं तसं प्रेम प्रकरण वगैरे काही नाही… त्याने ठरवलं होतंच तिच्यासोबत लग्न करायचं, मग तिच्याबद्दल माहिती असणं गरजेचं होतं आणि जर खरंच तिचं तसं काही असेल तर…
“सर, यात तिची संपूर्ण माहिती आहे सर,” जीवनने टेबलवर फाइल ठेवत सांगितलं.
“हं… ठीक आहे, तू जा…” शिव फाइल हातात घेत जीवनला म्हणाला.
“तिकडून कॉल वगैरे आला का?” फाइल बघत शिवने आकाशला विचारले. पण त्याची नजर फाइलमधल्या फोटोवर स्थिर झाली होती. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्यमिश्रित भाव जमा झाले होते… आणि त्याच्या चेहऱ्यावर स्माइल आली होती. आकाश त्याच्याकडेच पाहात होता.
“आकाश, काय विचारलं मी?” तो तसाच फोटोकडे पाहात म्हणाला.
“अं… नाही!” आकाश.
“मग तू कर कॉल…” शिवने आता नजर आकाशकडे वळवली.
तो उठून उभा राहात आकाशकडे चालत गेला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला म्हणाला, “मी जे काही करतोय ते सगळं विचार करून करतोय… विश्वास ठेव माझ्यावर.”
“हो, माझा आहे विश्वास तुझ्यावर…” आकाश त्याला मिठी मारत म्हणाला आणि बाहेर निघून गेला. शिव ती फाइल बाजूला ठेऊन त्याच्या कामाला लागला. तोच त्याचा फोन वाजला. अनोळखी नंबर पाहून त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या… त्याने फोन रिसिव्ह करून कानाला लावला… पलीडून “हॅलो” असा आवाज आला आणि इकडे शिव स्तब्ध झाला… तोच नाजूक गोड आवाज! आणि शिवचे डोळे आपोआप मिटले गेले.
हेही वाचा – …अन् सिया बाबा आणि शिववर संतापली!
“हॅलो… हॅलो… हा हॅलो आवाज येतोय का? फोन तर सुरूय.. कोणीच कसं बोलत नाही? ए नेहा, तुझ्या फोनमध्ये काही प्रॉब्लेम आहे का गं… आवाजच येत नाहीय…”
फोन उचलला गेल्यावर आरू कितीतरी वेळ ‘हॅलो हॅलो’ करत होती… पण समोरून काहीच प्रतिसाद येत नव्हता. तिने कानाचा फोन बाजुला घेऊन पहिला तर कॉल सुरू होता… म्हणून ती नेहाला म्हणजे तिच्या मैत्रिणीला वैतागत विचारलं.
“अगं ए, प्रॉब्लेम माझ्या फोनमध्ये नाहीये. बोलत नाहीत कोणी समोरून… आईला जर कळलं ना मी तुझ्याकडे आले तर, ओरडेल मला… आता जाते मी घरी… नंतर राम दादाच्या फोन वर फोन करीन घरी कोणी नसल्यावर…” असं म्हणताच नेहा फोन घेऊन निघून गेली. आरू मात्र वैतागून पाहात राहिली तिच्याकडे.
इकडे, शिवने फोन उचलून कानाला तर लावला, पण समोरून आरूचा आवाज ऐकला आणि हा हॅलो म्हणायचंच विसरून गेला… फोनवर तिचा आवाज त्याने पहिल्यांदाच ऐकला, पण तरीही ओळखलं त्याने… आणि हरवून गेला तिच्या त्या गोड नाजूक आवाजात… तो तसाच फोन कानाला लावून खुर्चीत बसला होता… फोन कट झालाय याचंही त्याला भान नाही राहीलं. डोळे बंद करून तिचा आवाज फील करत होता तो…
“अरे शिव…” आकाश केबिनमध्ये आला, पण शिवला असं पाहून पुढचं बोलायचं विसरून गेला… आणि त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागला.
“शिव… ए शिव…” आकाशने दोन वेळा आवाज दिला तरी, शिव तंद्रीतच होता!
” याला काय झालंय… असा काय हा?” स्वतःशीच पुटपुटत तो शिवच्या जवळ गेला अन् त्याच्या दुसऱ्या कानाजवळ मोठ्याने ओरडला “शिवSSS”
शिव जागेवरच उठून उभा राहिला हातातला फोन पण निसटून खाली पडला…!
“आकाश एवढं जोरात कोण ओरडत?” त्याच्या लगेच लक्षात आलं, आत्ता नक्की काय झालं ते. त्याने लगेच स्वतःला सावरत, आपल्या नेहमीच्या रागीट टोनमध्ये त्याच्यावरच ओरडला…
“हं… कोण ओरडतं ते सोड, कानाला फोन लावून तू कुठे हरवला होतास? असं तर मी तुला कधीच बघितलं नाही, यार! काय झालंय काय तुला?” आकाश त्याच्याकडे डोळे बारीक करून म्हणाला.
“कु… कुठं काय? काहीच नाही… तू कशाला आला होतास?” नजर चोरत त्याने विचारलं. हे असं नजर चोरून शिवचं बोलणं आकाश पहिल्यांदाच पाहात होता. पण त्याला अजून काही विचारलं तर, तो चिडेल म्हणून आकाशने विषय बदलत मीटिंगबद्दल सांगितलं.
त्यावर शिव ने “तू हो पुढे मी आलोच…” असं म्हणत आकाशला बाहेर पाठवलं. खाली पडलेला फोन उचलून त्याने नुकताच आलेल्या फोनचा नंबर सेव्ह करून मीटिंगसाठी केबिनमधून बाहेर पडला.
“काय बाई, फोन लावला पण कोणी बोललंच नाही. कुणाचा नंबर आहे ते पण माहीत नाही! काय करायचं आता? जाऊदे बघू नंतर, जे होइल ते होइल!” अस म्हणून आरूने शिवने भाऊंना दिलेलं कार्ड आपल्या पर्समध्ये ठेऊन दिलं आणि बाहेर गेली.
“बरं भाऊ, मी काय म्हणते, मी आणि पवन जातो आता परत. पवनचं पण ऑफिस आहे. भावना पण एकटी असते घरी तर…” आत्या.
“बरं, रामने ठरवल्यावर तुला फोन करून सांगेन पुढं काय करायच ते…” भाऊ म्हणाले.
थोडंफार बोलून पवन आणि आत्या पुण्याला निघून आले. रात्री राम शेतावरून घरी आला. जेवण झाल्यावर रात्री आरूचे चुलते वगैरे सगळे अंगणात जमले आणि सगळ्यांशी बोलून लग्नाची बोलणी करायचं ठरवलं. रामने होकार दिल्यामुळे सगळे खूश होते. आरू मात्र शांत होती. तिला नव्हतं लग्न करायचं आत्ताच! पण आपल्या भावासाठी ती करत होती.
या सगळ्यात ते फोटो प्रकरणही मिटलं होतं. आता ते विसरून लोक, एवढ्या मोठ्या घरातलं स्थळ चालून कसं आलं, याची चर्चा करत होते.
रामच्या वडिलांनी फोन करून, ते लग्नाला तयार आहेत, हेही आकाशला लगेच कळवलं.
इकडे पण रात्री जेवणाच्या टेबलवर हाच विषय सुरू होता. कारण, शिवने त्याच्या लग्नाबद्दल सांगितलं होतं. “पण विषय सियाच्या लग्नाचा सुरू होता, मधेच हे काय तुझ्या लग्नाचं आलं?” असं म्हणत त्याच्या बाबांचं चिडूनही झाल होतं. आजीला हे जरा नव्हतं पटलं, पण करणार काय? शिवच्या पुढे कोणाचं चालतंय! शिवाय सियाचं लग्न महत्त्वाचं होतं. कितीही जग पुढे गेलं असलं तरी आजीचे विचार जुनेच होते. त्या अजूनही जुन्या चालीरीती पाळून होत्या आणि असं तरण्याताठ्या पोरी आयुष्य भर घरी तर, ठेऊन घेऊ शकत नव्हत्या… आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सियाचं आधीच एक लग्न झालेलं त्यात असा कोरा, लग्न न झालेला मुलगा मिळतोय… या गोष्टी पुढे, बाकी सगळी कारणं फिकी होती!
हेही वाचा – शिवशी लग्न करायला आरू तयार झाली, पण कारण काय?
शिव आणि त्याची फॅमिली जरी शहरात राहात असली तरी, त्यांची नाळ गावाशी जोडलेली होती. अर्थात, याला कारणं आजीही होत्याच… आणि गावी सियाबद्दल चर्चाही व्ह्यायची… लग्न मोडल म्हणून! त्यांच्या घराण्यात सिया ही पहिलीच मुलगी होती, जिचा घटस्फोट झाला होता. तिचीही गावात बदनामी झालीच होती!
खरंतर, सिया आणि आरूची परिस्थिती सारखीच होती. फरक फक्त श्रीमंती आणि गरिबीचा होता. तसं तर शिवने आरूच्या बाबतीत घडलेला प्रकार घरी सांगितला नव्हताच. उगाच या गोष्टीमुळे वाद व्हायचे. कारण तो आपल्या आजीचे विचार जाणून होता.
माहीत नाही आज सकाळी सिया आणि तिच्या बाबांमध्ये काय बोलणं झालं. पण तिनेही तिचा होकार सांगितला होता. आता बस दोन्ही परिवार एकत्र येऊन लग्नाची बोलणी करायची बाकी होतं.
क्रमशः


