स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये बटाटेवडे, सामोसे, उडीदवडे बनविण्याच्या टिप्स पाहूयात.
- भज्याचे पीठ पाण्यात कालवण्यापूर्वीच त्यात खूप फेसून तेल घालावे. हळदीऐवजी खाण्याचा पिवळा रंग चिमूटभर घातल्यास भज्यांना रंग छान येतो. फेसून मोहन घातल्यामुळे भजी खुसखुशीत होतात. बटाटेवड्याच्या पिठाला हीच कृती करावी.
- सँडविचेस करताना ब्रेडच्या कडा सुरीने न कापता कात्रीने कापाव्यात. म्हणजे कडा पातळ आणि कमी वाया जातात. कापलेल्या कडा उन्हात कडक वाळवून मिक्सरमधून काढून कटलेट्ससाठी चुरा वापरावा.
- इडली रव्याचे एक पाकीट घ्यावे. त्यातील रवा सांजा करतो, त्याप्रमाणे भाजून घ्यावा आणि नंतर नेहमीप्रमाणे फोडणी करून, त्यात रवा, कढीलिंब, उडदाची डाळ किंवा मूगडाळ घालून जरुरीप्रमाणे तिखट-मीठ-पाणी घालावे आणि चांगली वाफ आणावी, म्हणजे उप्पीट तयार.
हेही वाचा – Kitchen Tips : सुरळीच्या वड्या, खमंग कांदा भजी, स्वादिष्ट दहिवडे…
- लहान मुले पालेभाजी खाताना कंटाळा करतात, म्हणून घरी ओव्हनमध्ये ब्रेड बनवताना शेपू किंवा मेथी अशा पालेभाज्या चिरून घालाव्यात व मसाला ब्रेड करावा.
- उडीदवडा करताना मसाल्यासह वाटलेला गोळा घेऊन प्लॅस्टिक पेपरवर ठेवावा. वडा थापताना त्यावर ओल्या नारळाचे (खोबऱ्याच्या) अर्धा इंची दोन तुकडे खालीवर लावावेत. त्यामुळे वडे तळताना तेल कमी लागते.
- सामोसे, कचोरी खुसखुशीत बनवण्यासाठी मैदा भिजविताना त्यात (अर्धा किलो मैद्याला) एक चमचा दही आणि एक चिमूटभर बेकिंग पावडर घालावी.
- खमंग ढोकळा करताना आदल्या दिवशी रात्री ताकात बसेल एवढे डाळीचे पीठ घालावे. दुसऱ्या दिवशी ढोकळा करताना पिठाच्या निम्मा रवा घालावा. ढोकळा चांगला स्पंजप्रमाणे होतो.
- पुऱ्या किंवा मटार करंज्यांच्या पारीसाठी कणीक भिजवताना थोडा रवा तेलावर फुलवून घेऊन त्यात घातल्यास पुऱ्या किंवा करंज्या खुसखुशीत होतात.
हेही वाचा – Kitchen Tips : केळ्याचे वेफर्स, पपईची भजी, हरभऱ्याची तळलेली डाळ…
- बटाटेवडा तयार करत असताना जे बेसन पीठ कालवून घेतो, त्यात थोडा एक-दोन स्लाइस ब्रेडचा कडा काढलेला मऊ भाग कुस्करून घातल्यास वडा कुरकुरीत तर होतोच आणि वरचा थरही जाडसर होतो.
- ब्रेड-चटणी सँडवीच करताना चटणीमध्ये थोडेसे लोणी मिसळावे आणि मग ती ब्रेडच्या स्लाइसला लावावी म्हणजे वेगळे लोणी लावायचा वेळही वाचतो, शिवाय चटणीला वेगळी चव येऊन लोण्याची बचत होते.


